फ्री कॉल करण्याचा आता नवा फंडा<br /><br /><br />इंटरनेटचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. व्हॉटसअॅप आणि इतर मेसेजिंग सर्व्हीसेस सुरु झाल्यानंतर एसएमएस करणेही मागे पडले. मागच्या काही काळात इंटरनेट स्वस्त झाल्याने ग्राहक ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉलिंगलाही पसंती देत असल्याचे दिसते. याशिवाय अनेकांच्या घरात आणि ऑफीसमध्ये वाय-फाय उपलब्ध असते. या वाय-फायचा वापर करुन आता तुम्हाला कॉल करता येणार आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) अशाप्रकारे इंटरनेटच्या वापराने फोन कॉलिंगला परवानगी दिली आहे.<br />अनेकदा मोबाईलला नेटवर्क न मिळाल्याने फोनवर बोलण्यात अडचणी येतात. त्यावर तोडगा काढण्यासाठी दूरसंचार नियामक प्राधिकरणाने ग्राहकांसाठी ही विशेष सेवा पुरविण्यास मंजूरी दिली आहे. ही सेवा ग्राहकांसाठी लवकरच सुरु होणार असल्याचे म्हटले जात असले तरीही यामध्ये अनेक तांत्रिक घटक असून ही सुविधा प्रत्यक्ष कार्यरत होण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो. ही सुविधा वापरुन ग्राहकांना मोबाईल किंवा लँडलाइन नंबरवर कॉल करता येणार आहे. मात्र ट्रायच्या या निर्णयाला अनेक टेलिकॉम कंपन्यांनी विरोध दर्शवला आहे.